गुरुवार, १७ नोव्हेंबर, २०१६

सकाळी रुमचा जीना उतरून खाली आलो आणि डावीकडे मुख्य रस्त्याच्या बाजूच्या गटारात एक स्त्री  उतरून काही तरी शोधत असल्याचे मला दिसले . या पूर्वीही अशा प्रकारे गटारात उतरलेल्या माणसांना मी विचारलंय की का उतरलाय म्हणून ! त्यांनी काहीच उत्तर दिले नव्हते . म्हणून बाजूला ऊभा असणाऱ्या पप्पूला विचारल्यावर त्याने सांगितले की , ' ही माणसं गटारात उतरून सोनं आणि चांदीचे कण शोधत असतात ... . '
    मला दिसत होतं की , त्यांचा सगळा गोतावळा मन लावून कामं करत होता . एक महीला गटाराच्या तळातून माती , वाळू खरवडून काढत होती आणि बुट्टीत ओतत होती . दुसरी महीला ती माती आणि वाळू चाळत होती .  एक पुरुष छोट्या झाडणीने रस्त्यावरची माती गुडघ्यावर बसून झाडत होता ... आणि ह्या सर्वांच्या बाजूला दोन लहान मुले खेळत होती . पूर्वीही वाटलंय ... आत्ताही वाटलं मला की , काम करून खाताहेत , खाऊ देत ; आपण काही तरी देऊन ऊगाच भव्य समाजसेवेच्या अविर्भावात नको जाऊया !! पण आज या कामाबाबतचं वास्तव फार वाईट आहे . कितीही वेळ गटारं खंगाळली तरी काही मिळण्याची शक्यता धूसरच ! कारण सोन्या - चांदिची कारागिरी करणारे स्थानिक कारागीर खूप कमी प्रमाणात आहेत . त्यामुळे सोन्या - चांदिचा कचरा तरी कुठून पडणार !
    मी बोललो त्या ताईशी . धारवाड , कर्नाटकहून आल्यात , त्या आणि त्यांचं कुटुंब . मी त्यांना विचारलं की , काही मिळतंय का म्हणून तर त्यांनी सांगितलं , परंपरागत व्यवसाय आहे , करतोय ; पण अशी अनेक गटारं खंगाळल्यावर क्वचितच काही मिळतं ! कुणालाही पै न सोडणारी माणसं आता कचऱ्यातून सोनं - चांदी नाही फेकत ! मला कसंतरीच झालं . मी त्या ताईला हँडग्लोज , गमबूट दिले तरी ते किती दिवस पुरणार तिला ; उलट ह्या वस्तूंच्या सवयीनं तिची गटारातल्या त्या पाण्यासोबत लढण्याची तिची प्रतिकारशक्ती कमी होईल ! मी माझ्यासोबत त्या ताईच्या कुटुंबाला देण्यासाठी पिशवी भरून कपडे आणि लहान मुलांसकट त्या ताईला चपला दिल्या आणि तिच्या लहान मुलाला छोटसं खेळणं ! ते खेळणं बघून ती हसली ... आणि जाताना फिरून म्हणाली ' जाती हूँ भैय्या ... " . ...मी खूपच हतबल समजतो स्वतःला अशावेळी !
( एका ताईनं हा फोटो काढला नि मला दिला . मग मी ही घटना आज लिहिली ...7 दिवसांनी ! )